नवी दिल्ली :- भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह आणि विनोद तोमर यांच्या नियमित जामिनावर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ब्रिजभूषण यांच्यावर आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्याविरुद्ध असे कोणतेही पुरावे किंवा दावे नाहीत, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ब्रिजभूषण स्वत: न्यायालयात हजर झाले होते. आता गुरुवारी न्यालयात नियमित जामिनावर सुनावणी होणार आहे. त्याचा निर्णय येईपर्यंत ब्रिजभूषण अंतरिम जामिनावर राहतील.
ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यासह कुस्ती महासंघाचे पदाधिकारी विनोद तोमर यांनाही अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यांना 6 पैकी 2 प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात आले आहे. आता याबाबत गुरुवारी काय निर्णय जाहीर होतो याकडे महिला कुस्तीपटूंचे लक्ष लागले असून, त्यानंतरच पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे कुस्तीपटूंनी म्हटले आहे.