पुणे -सलग दुसऱ्या दिवशीही वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपामुळे ससून रुग्णालयातील सेवा विस्कळीत झाली. ससूनमध्ये राज्यभरातून शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. मात्र, संपामुळे अनेकांना तपासणीसाठी ताटकळत रहावे लागले. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी संपाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. “संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक जीवन-मरणाच्या दारात उपचार घेत असताना संपावर गेले असते का?’ असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
दरम्यान, संपाच्या दुसऱ्या दिवशी वर्ग चार मधील 50 टक्के कर्मचारी दुपारनंतर पुन्हा कामात हजर झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी संपामुळे अनेक शस्त्रक्रीया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. तर जे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत, त्यांच्या सोनोग्राफी, सीटीस्कॅन यासह इतर वैद्यकीय तपासण्यांसाठी नातेवाईकांनाच धावपळ करावी लागत आहे.
रुग्णालयात निवासी डॉक्टरांसह, विविध खासगी महाविद्यालये व रुग्णालयांच्या परिचारीकांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आले आहे. सध्या, 200 परिचारीका आणि 500 निवासी डॉक्टर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. मात्र, प्रत्यक्षात नातेवाईकच डॉक्टरांच्या मदतीला उतरले आहेत. ससून रुग्णालयातील 773 परिचारिका आणि 617 कर्मचारी संपात सहभागी झाल्याने यंत्रणा काही प्रमाणात ढासळली आहे. रुग्णांना उपचार देण्यासाठी आता रेसिडेन्ट डॉक्टर 24 तास सेवेत आहेत.
दिवसभरात सिटीस्कॅन, सोनोग्राफी आणि एक्स-रे काढण्यासाठी मला तीनवेळा दुसऱ्या मजल्यावरून खाली यावे लागले. आमचा रुग्ण झोपून आहे, त्यामुळे स्ट्रेचरवरून उचलून मशीनवर ठेवण्यासाठी मदतीला कोणीच नव्हते. मलाच अन्य रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीसाठी बोलवावे लागले.
– उपचार घेणाऱ्या रुग्णाचे एक नातेवाईक
कर्मचाऱ्यांनी संप का केला माहित नाही, पण त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य आजारी किंवा अत्यवस्थ असता तर त्यांनी उपचारा करण्यास नकार दिला असता का? किमान रुग्णसेवेची शपथ तरी लक्षात ठेवून कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा देणे अपेक्षीत होते.
– उपचार घेणाऱ्या रुग्णाचे एक नातेवाईक