पुणे -नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दस्तनोंदणीला त्याचा मोठा फटका बसला आहे. येत्या एक एप्रिलपासून रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने जमीन, सदनिका यांच्या दस्तनोंदणीसाठी मार्च अखेरीस मोठी गर्दी होते. मात्र, संपामुळे शहरातील 27 पैकी निम्मेच कार्यालये सुरू असल्याने दस्तनोंदणी घटली असून त्याचा परिणाम मुद्रांक शुल्कापोटी उत्पन्नावरही झाला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दररोज दिड ते दोन हजार दस्तांची नोंदणी होते. मार्च अखेरीस हा आकडा अडीच हजारांवर जातो. तर, दररोज सरासरी 50 ते 70 कोटींचा महसूल जमा होतो. मात्र, या संपामुळे मागील दोन दिवसांत अवघे 755 दस्त नोंदणी झाली असून त्यामधून 25 कोटींचा महसूल जमा झाला आहे.
राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा नोंदणी व मुद्रांक विभाग हा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. रेडी रेकनरचे नवे दर एक एप्रिलपासून लागू होतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक दस्तनोंदणी होते. तसेच, सर्वाधिक महसूल सुद्धा मार्च महिन्यातच जमा होतो. दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी होत असताना संपामुळे नागरिकांना दस्तनोंदणी वाट पहावी लागत आहे. तर जी कार्यालये सुरू आहेत. त्या कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढताना दिसते.
मंगळवारी (दि.14) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 27 पैकी 11 कार्यालये सुरू होती. दिवसभरात 355 दस्तनोंदणीतून सुमारे 10 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर बुधवारी दिवसभरात सुमारे 400 दस्तांची नोंदणी झाली असून 15 कोटींचा महसूल जमा झाला असल्याची माहिती नोंदणी विभागाकडून देण्यात आली.
संप कधी मिटणार?
मार्च महिना संपण्यास 15 दिवस राहिलेले असून हा संप कधी मिटतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दस्तनोंदणी काही ठिकाणीच सुरू असल्याने त्याठिकाणी गर्दी होत आहे. हा संप मिटल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.