पुणे – : देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटने थैमान घातलं. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून येत होते. त्यामुळे आरोग्यव्यवस्थेवर ताण आला होता. आता करोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील रुग्णवाढीचा वेगही मंदावला आहे. मात्र पुणेकरांची चिंता कमी होण्याऐवजी वाढविणारं वृत्त आलं आहे.
करोना व्हायरस केवळ पृष्ठभागामार्फतच नाही तर हवेतूनही पसरतो हे आधीच स्पष्ट झालं आहे. मात्र आता पुण्यातील सांडपाण्यातही करोना व्हायरस सापडला आहे. याआधी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सांडपाण्यात करोना व्हायरस सापडला होता.
पुणे महापालिका आणि आणि नॅशनल केमिकल लेबोरेटरी यांनी पुण्यातील सांडपाण्याचा एकत्रित अभ्यास केला. सांडपाण्यात करोना शोधण्यासाठी डिसेंबर २०२० पासून एक प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील वेगवेगळ्या भागातून सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले होते.
पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून 23, एनसीएल कॉलनीतल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून 9 आणि नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचे 17 नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांची RT-qPCR पद्धतीने तपासणी करण्यात आली. त्यात करोना व्हायरस आढळून आला आहे.
आम्हाला सांडपाण्याच्या नमुन्यात करोना विषाणू असल्याचं दिसून आलं आहे, असं तपासणी प्रकल्पाचे समन्वयक शास्त्रज्ञ डॉ. महेश धरणे यांनी सांगितल्याच वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
याआधी पोलिओच्या महासाथीवेळी अशा पद्धतीने सांडपाण्याची तपासणी करण्यात आली होती. एखाद्या भागात आजाराचा संसर्ग किती प्रमाणात झाला आहे, हे तपासण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येतो. आता करोनाचा संसर्ग तपासण्यासाठी देखील या पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याचे डॉ. धऱणे यांनी नमूद केलं.