नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने भारतात चिंता वाढवली आहे. मंगळवारी देशात 16 नवे ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 216 इतकी झाली आहे. राजधानी नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे.
देशातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन राज्यातील आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या 11 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 65 इतकी झाली आहे. तर जम्मू काश्मीरमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशातील 216 रुग्णापैकी 77 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोव्हिड-19 आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सूचनांचे पत्र पाठवण्यात आलं आहे.
सर्व जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरीयंट डेल्टा व्हेरीयंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पत्राद्वारे राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.