ICC ने ODI World Cup 2023 च्या पहिल्या सामन्यासाठी पंचांची नावे जाहीर केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी सांगितले की, भारताचे नितीन मेनन आणि कुमार धर्मसेना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकातील पहिल्या सामन्यासाठी पंचगिरी करतील. माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ या सामन्याचे सामनाधिकारी असतील. अहमदाबाद येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पॉल विल्सन टीव्ही पंच तर सैकत चौथे पंच असतील.
आयसीसीच्या एमिरेट्स एलिट पॅनेलमधील सर्व 12 पंच आणि आयसीसीच्या उदयोन्मुख पंच पॅनेलच्या चार सदस्यांसह एकूण सोळा जण स्पर्धेत पंच म्हणून काम पाहतील.
या यादीत लॉर्ड्स येथे 2019 च्या अंतिम सामन्यासाठी नियुक्त केलेल्या चार पंचांपैकी तीन पंचांचा (धर्मसेना, मरायस इरास्मस आणि रॉड टकर) समावेश आहे. या यादीत एकमेव अलीम दार यांचा समावेश नसेल, कारण त्यांनी यावर्षी मार्चमध्ये एलिट पॅनेलचा राजीनामा दिलेला आहे.
ODI विश्वचषक 2023 साठी ICC एलिट पॅनेलमध्ये सामनाधिकारी म्हणून माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेफ क्रो, अँडी पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि श्रीनाथ यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी आणि अंतिम सामन्यांची निवड योग्य वेळी जाहीर करण्यात येणार असून, सर्व लीग टप्प्यातील सामन्यांसाठी अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
आयसीसीचे महाव्यवस्थापक वसीम खान म्हणाले, “या अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धेसाठी तुम्हाला प्रत्येक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची गरज असते. पंच, रेफरी आणि या दोघांचा एक उदयोन्मुख गट हा तयार करावाच लागतो. या विश्वचषकासाठी निवडलेल्या आयसीसी एलिट पॅनेलमधील सदस्यांकडे अफाट कौशल्य, अनुभव आणि जागतिक दर्जाचे मानके आहेत. आम्ही या स्पर्धेसाठी बनवलेल्या गटाबद्दल आनंदी आहोत. ही स्पर्धा कुठल्याही वादाशिवाय निर्विघ्नपणे पार पडेल, यात मला कुठलीही शंका नाही.”
विश्वचषक स्पर्धेसाठी पंचांची यादी :- ख्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, मरायस इरास्मस, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, नितीन मेनन, अहसान रझा, पॉल रीफेल, शराफुद्दौला इब्न शैद, रॉड टकर, अॅलेक्स वॉर्फ जोएल विल्सन आणि पॉल विल्सन.