मुंबई – कोविड काळातील बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटातील किशोरी पेडणेकरांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत. अशातच आता ठाकरे गटातील आणखी एका आमदारासही मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला असून, यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे गट अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेत बंड होऊनही उद्धव ठाकरे यांची साथ न सोडलेल्यांपैकी एक असलेले रवींद्र वायकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
रवींद्र वायकर आणि त्यांचे काही सहकारी हे जोगेश्वरीमधील व्यारवली भागात आलिशान फाईव्ह स्टार हॉटेल उभारत आहेत. याबाबत त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगी मागितली असता मुंबई महापालिकेने रद्द ठरवली होती. याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितला होता.
यावर झालेल्या सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने केलेली याचिका फेटाळून लावली असून, मुंबई महापालिकेचा निर्णय कायम ठेवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी यादृष्टीने उच्च न्यायालयाने आपला आधीचा अंतरिम आदेश चार आठवड्यांसाठी कायम ठेवला आहे. त्यामुळे तोपर्यंत महापालिकेला झालेल्या बांधकामावर कारवाई करता येणार नाही.