बेलग्रेड (सर्बिया) :- भारताची युवा कुस्तीपटू अंंतिम पंघालने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या पात्रता फेरीत विद्यमान विश्वविजेत्या अमेरिकेच्या ऑलिव्हिया डॉमिनिक पॅरिशचा पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळण्याकडे आगेकुच केली.
महिलांच्या 53 किलो गटातील पहिल्या फेरीच्या लढतीत एका वेळी 0-2 ने पिछाडीवर असणाऱ्या पंघालने जोरदार पुनरागमन करताना 3-2 असा विजय मिळवला. अमेरिकन पैलवान सुरुवातीलाच वरचढ होती. तिने पंघालचा उजवा पाय पकडला आणि दोन गुण मिळवून भारतीय कुस्तीपटूला खाली पाडले. यानंतर, 19 वर्षीय पंघालने मात्र भक्कम बचाव केला आणि प्रतिस्पर्ध्यांचे असे आणखी दोन प्रयत्न हाणून पाडले.
या दरम्यान तिने भक्कम बचाव कायम ठेवताना एकही गुण गमाविला नाही. त्यानंतर अंतिमने पॅरिशचा डावा पाय पकडून तिला खाली पाडताना दोन गुण मिळवून सामना बरोबरीत आणला. पुढेही अंतिमने पॅरिशला निष्क्रिय करत आणखी एक गुण मिळवला. त्यानंतर पंघालने आक्रमन व बचावाचे उत्तम संतुलन साधताना शेवटपर्यंत आपली आघाडी कायम राखली आणि विजय मिळवला.
त्यानंतर लगेच झालेल्या पुढील फेरीत पंघालने पोलंडच्या रोकसाना मार्टा जेसीना हिचा तांत्रिक प्रावीण्यवर अवघ्या एक मिनिट 38 सेकंदात पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली. मात्र, मनीषा (62 किलो), प्रियांका (68 किलो) आणि ज्योती ब्रेवाल (72 किलो) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांचे भविष्य त्यांना पराभूत करणाऱ्या खेळाडूंच्या पुढील निकालावर अवलंबून असेल.
भारतातील सर्व 10 पुरुष फ्रीस्टाइल कुस्तीपटू आधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ते ऑलिम्पिक कोट्यासह बिगर ऑलिम्पिक प्रकारांमध्येही पदक जिंकण्यात अपयशी ठरले आहेत.