अम्मान (जॉर्डन) – शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून हरियाणातील “हिसार’ची रहिवासी अंतिम पंघालने इतिहास रचला. सलग दोनदा अंडर-20 जागतिक कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी ती भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली. तिने येथे 53 किलोमध्ये विजेतेपद पटकावले. तर, रोहतकची सविता(62 किलो) व प्रिया मलिकने (76 किलो) गटात सुवर्णपदक पटकाविले.
यासह अंतिम कुंडूने (65 किलो) रौप्य तर रीना (57), आरजू (68) आणि हर्षिता (72) यांनी या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. पंघालने अंतिम सामन्यात युक्रेनच्या मारिया येफ्रेमोव्हाचा 4-0 असा पराभव केला. गेल्या वर्षी ती प्रथमच अंडर-20 विश्वविजेती ठरली होती. दुसरीकडे, 62 किलो वजनी गटात सवितानेही तांत्रिक कौशल्याच्या जोरावर व्हेनेझुएलाच्या पाओला मेंटोरो चिरिनोसचा पराभव करत सुवर्ण कामगिरी केली.
तर प्रिया मलिकने 76 किलो वजनी गटात जर्मनीच्या लॉरा सेलिव्ह कुएनचे आव्हान 5-0 असे मोडून काढले. यासह, अंतिम कुंडूचा सामना स्थानिक कुस्तीपटू एनिको अलेक्सशी झाला, ज्यामध्ये ती 2-9 अशी पराभूत झाली. तत्पूर्वी, रीनाने कांस्यपदकाच्या लढतीत कझाकस्तानच्या शुगायला ओमिरबेकचा 9-4 असा पराभव केला. आरजू आणि हर्षिताने कांस्यपदक जिंकून भारताचे पदकतालिकेतील स्थान वाढविले.
विनेशच्या थेट निवडीला आव्हान
भारतीय ऑलिम्पिक समितीने स्थापन केलेल्या ऍड व्हॉक समितीने महिलांच्या 53 किलोमध्ये विनेश फोगट आणि पुरुषांच्या 65 किलोमध्ये बजरंग पुनिया यांना थेट आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. आयओसीच्या या निर्णयानंतर अंतिम पंघाल व सुजित कलकल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या थेट निवडीला आव्हान दिले होते.
मात्र, त्यांचे अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. परंतू, नंतर स्टार कुस्तीपटू विनेशने रोहतक येथे सराव करताना दुखापतग्रस्त झाल्यानंतर आशियाई स्पर्धेतून माघार घेतली. फोगटच्या माघारीनंतर पंघाल पुढील महिन्यात चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.