आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सहभागी होत असलेला महिला क्रिकेट संघ गुरुवारी(दि.२१) उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. या T20 सामन्यात भारतीय संघ नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरशिवाय मैदानात उतरेल. बांगलादेशविरूध्दच्या मालिके दरम्यान वाईट वर्तनामुळे तिच्यावर आयसीसीने दोन सामन्यांची बंदी घातली आहे. तिच्या अनुपस्थितीत स्मृती मानधना संघाची कमान सांभाळणार आहे.
भारतीय संघ हा एशियाडमधील सर्वोच्च मानांकित संघ आहे. सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारताला केवळ तीन विजय मिळवावे लागतील. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर हरमनप्रीतला विजेतेपदाचा सामना खेळण्याची संधी मिळेल. येथील तिन्ही सामने भारतासाठी बाद फेरीतील असतील. भारत आणि मलेशिया यांच्यातील सामना पिंगफेंग क्रिकेट फील्ड, झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, हांगझोऊ येथे सकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
नऊ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 2010 आणि 2014 च्या आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, परंतु भारताने या दोन्ही स्पर्धांमध्ये एकही संघ उतरवला नाही, त्यामुळे 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून क्रिकेटला वगळण्यात आले होते.
बीसीसीआयनेही या सामन्यांमध्ये शेवटच्या क्षणी संघ उतरवले आहेत. भारताने महिला आशिया चषक आठपैकी सात वेळा जिंकला आहे. भारतीय संघ सध्याचा आशियाई चॅम्पियनही आहे. एवढेच नाही तर भारतीय संघाने गेल्या तीन टी-20 विश्वचषकांमध्ये उपांत्य फेरीत किंवा त्यापुढेही मजल मारली आहे.
भारताचा आशिया खंडातील उत्कृष्ट विक्रम लक्षात घेता या स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.
मलेशियाने मंगळवारी हाँगकाँगचा 22 धावांनी पराभव करत आगेकूच केली. भारत आणि मलेशिया याआधी दोनदा भिडले आहेत. दोन्ही वेळा भारताने विजय मिळवला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताने विजय मिळवला तर उपांत्य फेरीत त्याचा सामना बांगलादेशशी होऊ शकतो. पाकिस्तानचा सामना इंडोनेशियाविरूध्द होणार आहे.
भारतीय महिला संघ : स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा, देविका वैद्य, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (उपलब्ध नाही), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, कनिका आहुजा, अमनजोत कौर, उमा छेत्री (विकेटकीपर), बरेड्डी अनुषा, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, तीतस साधू.