बुडापेस्ट: भारताचा उदयोन्मुख कुस्तीपटू रविंदर याला 23 वर्षांखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत रजतपदकावर समाधान मानावे लागले.
किर्गिझस्तानच्या उलुकबेक झोल्डोशबेकोवने रविंदरचा 5-3 असा पराभव केला. यापूर्वी, 2017 मध्ये बजरंग पुनिया (65 किलो), विनोदकुमार (70 किलो), रितू फोगट (48 किलो) यांनी, तर 2018 मध्ये रवी दहिया (57 किलो) यांनी या स्पर्धेत रजतपदक पटकावले होते.
या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत इतिहास घडविण्यासाठी रविंदर खूपच आशावादी होता, मात्र त्याला अपयश आले. रविंदरने सुरुवातही चांगली केली होती. पहिल्या तीन मिनिटांअखेर रविंदरने 1-0 अशी आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर लगेचच उलुकबेकने दुखापत झाल्याचे सांगत वेळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉक्टरांचे पथक आले व त्यांनी तपासणी केली असता त्याने खेळण्याची तयारी दाखविली.
मात्र, त्यात दुखापत नसून केवळ वेळ काढण्याचा उद्देश होता. उलुकबेकने त्यानंतर मात्र आक्रमक खेळ केला. उलुकबेकने रविंदरच्या डाव्या पायावर ताबा मिळविला आणि 4-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर रविंदरने लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आले व हा सामना उलुकबेकने जिंकला.