मुंबई :- भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याची खेळी आगामी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत निर्णायक ठरेल, असा विश्वास भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केला आहे.
एकदिवसीय सामन्यांत सूर्यकुमारची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. तरीही त्याची विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने अनेकांना आश्चर्य स्वाभावीक आहे मात्र, त्याची क्षमता अफाट असून त्याला केवळ त्याच्या दृष्टिकोनात बदल करावा लागणार आहे. टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधील फरक त्याने वेळीच ओळखला तर तो जागतिक किर्तीचा फलंदाज बनेल. एकदिवसीय सामन्यांत 25 व्या षटकापासून 40 व्या षटकापर्यंत कशी फलंदाजी करायची असते याबाबत त्याच्याशी सातत्याने बोललो आहे. त्याच्या खेळीत परिपक्वता येत असून विश्वकरंडक स्पर्धेत तो भारताच्या मधल्या फळीत सरस कामगिरी करेल, असेही बांगर म्हणाले.
मधल्या षटकांमध्ये षटकार आणि चौकार सहज मारता येत नाहीत. जेव्हा तीन-चार बळी गेलेले असतात तेव्हा तर दडपण जास्त असते. तेव्हा चौकार व षटकारांच्या मागे न लागता संयम दाखवत खराब चेंडूंची प्रतिक्षा करणे गरजेचे असते. तसेच त्यावेळी आणखी बळी न गमावता डाव सावरणे आवश्यक असते, असेही ते म्हणाले.
टी-20 क्रिकेटमध्ये संपूर्ण 20 षटके चेंडू टणकच राहतो. पण एकदिवसीय सामन्यांत अखेरच्या षटकांत चेंडू मऊ पडतो. त्यामुळे चौकार व षटकार मारणे सातत्याने शक्य नसते. हेच आता सूर्यकुमारला ओळखता आले पाहीजे. या मधल्या षटकांतही धावा करण्यासाठी व त्यात आक्रमक फलंदाजी करण्यासाठी प्रत्येक फलंदाज काहीतरी योजना तयार करतो तेच आता सूर्यकुमारलाही करावे लागेल. सूर्यकुमारच्या खेळात जर काही सुधारणा हवी असेल तर ती म्हणजे 25 ते 40 व्या षटकांदरम्यानच्या फलंदाजीच्या शैलीत करावी लागेल, असेही बांगर म्हणाले.