ICC T20I Rankings – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी T20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. गेल्या तीन महिन्यांपासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असूनही सूर्यकुमार यादव आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खान गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये परतला आहे.
आयपीएलच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्ससाठी पुनरागमन करणाऱ्या सूर्यकुमारचे 861 गुण आहेत तर फिल सॉल्ट 802 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. डिसेंबरमध्ये स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाल्यापासून सूर्यकुमार यादव क्रिकेट खेळलेला नाही. या शस्त्रक्रियेमुळे सूर्यकुमारला इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील मुंबई इंडियन्स संघासाठी पहिले काही सामने खेळता येणार नाहीत. सूर्यकुमार खेळू न शकल्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का आहे. यावेळी मुंबईचा संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधाराला प्लेइंग कॉम्बिनेशनबाबत खूप संघर्ष करावा लागू शकतो.
दरम्यान, रशीद खान दुखापतीमुळे चार महिने मैदानापासून दूर होता आणि पुनरागमनाच्या मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. आयर्लंडविरुद्धच्या 2-1 अशा विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा रशीद खान पहिल्या दहामध्ये परतला आहे. त्याने नवव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर चार स्थानांनी झेप घेतली. या मालिकेतील तीन सामन्यांत त्याने आठ विकेट्स घेतल्या होत्या.
अफगाणिस्तानचा नवीन उल हक दोन स्थानांनी प्रगती करत 55व्या स्थानावर पोहोचला आहे. आयर्लंडचा जोश लिटल सात स्थानांनी वाढून 39व्या, मार्क अडायर दोन स्थानांनी 56व्या आणि बॅरी मॅकार्थी 15 स्थानांनी 77व्या स्थानावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.