Mumbai Indians, IPL 2024 :- आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या काही सामन्यांना मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव मुकणार असल्याचे समोर आले आहे. ही स्पर्धा येत्या 22 मार्चपासून सुरू होणार असून याआधी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच संघ व्यवस्थापनाने हार्दिक पंड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले होते.
सूर्यकुमार यादव पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर जाऊ शकतो. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला दुखापत झाली होती. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव व तंदुरुस्ती कार्यक्रमावरभर देत आहे. तो
पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. मुंबईचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 27 मार्चला होणार आहे. या दोन सामन्यांपूर्वी एनसीएचे वैद्यकीय पथक सूर्याला तंदुरुस्ती प्रमाणपत्र देईल की नाही, याबाबत शंका आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता. घोट्याच्या दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकाही खेळू शकला नाही.
सूर्याच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली आहे. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये तो अर्शदीप सिंगसोबत सराव करताना दिसला होता. सूर्यकुमारने आतापर्यंत भारतीय संघासाठी 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 171 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 2141 धावा केल्या आहेत.
IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….
त्याला यंदाच्या टी-20 विश्वकरंडकातही खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र, आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो यावरही सगळे अवलंबून असेल. सूर्या मुंबई इंडियन्सच्या महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 139 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एका शतकाच्या मदतीने 3249 धावा केल्या आहेत.