मुंबई – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत 418 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिकांच्या वर्गांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना शिंदे यांनी दावा केला की, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे.
अभ्यासिका वर्गांच्या ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह कौशल्य, रोजगार विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांच्यासह 418 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने यावेळी उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले की, आज चाळीस हजार विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. नव्याने सुरू झालेल्या 75 आभासी क्लासरूम आणि आज सुरू झालेल्या अभ्यासिकांचा विद्यार्थी लाभ घेवून स्वविकास करतील,
अशी मला आशा आहे. कारण भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. याशिवाय युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
परदेशी गुंतवणूकीमध्ये राज्य पहिल्या क्रमांकावर
महाराष्ट्र राज्य नेहमी देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील राज्य प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आज अनेक उद्योजक राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत.
ही बाब लक्षात घेऊन उद्योग जगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान युवा पिढीला देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.