पिंपरी – ब्रेललिपी कोडचा वापर करुन मतदान मशीनवर असलेले उमेदवार कसे ओळखायचे? मतदान कसे करायचे? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी प्राधिकरण येथील डॉ. हेगडेवार सभागृहात अंध मतदारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकसभा निवडणुकीत दिव्यांगाना मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने विषेश कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून अंध मतदारांना प्रशिक्षण देण्यात आले. अंध मतदारांना मतदान करण्यासाठी मदतनिस देण्यात येणार आहे. अंध मतदारांनी मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनमधून येणाऱ्या स्लिपवर केलेले मतदान बरोबर आहे का? याची तपासणी केल्यानंतर ही स्लिप बॉक्समध्ये टाकण्यात येणार असल्याची माहीती मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत यांनी दिली.