कापूरहोळ, (वार्ताहर) – राष्ट्रवादी पार्टी फुटीनंतर प्रथमच भोर तालुक्यात शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. भोर व वेल्हे तालुक्यातील शेतकरी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांना राज्यातील महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
केळवडे तालुका भोर येथे महाविकास आघाडीच्या वतीने दि ७ रोजी सकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी आमदार संग्राम थोपटे बोलत होते. या परिषदेसाठी भोर तालुका काँग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भोर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार भोर तालुका अध्यक्ष रवींद्र बांदल,
प्रतापराव शिळीमकर, वेल्हे तालुका काँग्रेस अध्यक्ष नाना राऊत, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वेल्हे तालुका अध्यक्ष दीपक दामगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वेल्हे तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे यांच्यासह भोर वेल्हे तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार थोपटे पुढे म्हणाले की, भोर व वेल्हे तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा शनिवार, दि. ९ रोजी दु. ४ वाजता पुणे बैंगलौर राष्ट्रीय महामार्गालगत मौजे हरिश्चंदी तालुका भोर येथील प्रांगणात होणार आहे.
या सभेस माजी केंद्रीय कृषि मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार व प्रवक्ते संजय राउत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शदरचंद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भोर वेल्हे मुळशी तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे तसेच कुलदीप कोंडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
भोर वेल्हे तालुक्यातील जनतेच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. तरी भोर व वेल्हे तालुक्यातील नागरीक, शेतकरी, कार्यकर्ते व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकत्यांनी सदर सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास आघाडी भोर वेल्हा मुळशी लोकसभा समन्वयक अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी केले.