पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला, त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
राज्य शासनाने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच त्यासंदर्भातील अध्यादेशही प्रसिद्ध केला. दि. २६ फेब्रुवारीपासून या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी केंद्रनिहाय आरक्षण देण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचे परिपत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.
पीएच.डी.च्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेप्रमाणेच (नेट) राज्यस्तरीय पात्रता परीक्षेलाही (सेट) मान्यता आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षांमध्ये आवश्यक गुण प्राप्त न झालेले विद्यार्थी “पेट’ माध्यमातून प्रवेशाला पसंती देतात. पीएच.डी. प्रवेश पूर्वपरीक्षेसाठी (पेट) उपलब्ध तारखा आणि मतदानाच्या तारखा यांचा मेळ विद्यापीठाला घालावा लागणार आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण देत मेमधील परीक्षा पार पाडणे विद्यापीठासमोरील आव्हान असणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच विद्यापीठाला “पेट’ची तारीख निश्चित करणे सोईस्कर ठरणार आहे.