कराड -पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मोहितेवाडी ता. कोरेगाव येथील उंच पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मोहीतेवाडी गावानजीक पूर्वी कमी उंचीचा पूल होता. सदर ठिकाणी तारगाव, मोहितेवाडी, वाठार किरोली, आर्वी, नागझरी, पुसेसावळी या रस्त्याचा व वरील राज्यमार्गाचा छेद होतो. येथे दोन्ही रस्त्यांचे जंक्शन काटकोनात आहे.
त्यामुळे सातत्याने येथे छोटे-मोठे अपघात घडत होते. त्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना पत्राद्वारे सदर ठिकाणी उंच पुलाचे काम व्हावे अशी सूचित केले होते.
या ठिकाणी पुलाच्या कामासाठी अपघातग्रस्त निधीमधून सुमारे 80 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला होता. सध्याच्या उंचपुलाचे काम प्रगतीत असून पूर्णत्वाकडे गेले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोड रस्त्यांचे खडीकरण झाले आहे व पावसाळा संपताच डांबरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे.
या ठिकाणी उंच पूल झाल्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. नागरिकांना गेले अनेक दिवस अडचणींचा सामान करावा लागत होता. त्या अडचणी आता मिटणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक ना. बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद देत आहेत.