पणजी (मापुसा) : महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत झारखंडकडून 0-3 असा पराभव पत्करला. झारखंडच्या विजयात अलबेला राणी टोप्पोच्या दोन गोलचे महत्त्वाचे योगदान ठरले.
पेड्डीम क्रीडा संकुलाच्या हॉकी मैदानावर चालू असलेल्या या स्पर्धेत ब-गटातील या सामन्यात प्रमोदीनी लाक्राने चौथ्याच मिनिटाला मैदानी गोलद्वारे झारखंडचे खाते उघडले. त्यामुळे अक्षता ढेकळेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचा संघ दडपणाखाली खेळला.
मग दुसऱ्या सत्रात 21व्या मिनिटाला अलबेलाने झारखंडची आघाडी 2-0 अशी वाढवली. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आले. चौथ्या सत्रात 58व्या मिनिटाला अलबेलाने दुसरा वैयक्तिक गोल नोंदवून झारखंडची आघाडी 3-0 अशी केली.
दरम्यान, महाराष्ट्राने मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान गोव्याला 2-1अशी धूळ चारली होती. महाराष्ट्राचा पुढील सामना शनिवारी पंजाबशी होणार आहे.