सेऊल – आशियाई चॅलेंजर महिला हॉकी स्पर्धेत एका खेळाडूला करोनाची बाधा झाल्यामुळे या स्पर्धेतून भारताच्या महिला हॉकी संघाने माघार घेतली आहे.
संघातील एक महिला खेळाडू करोनाबाधित झाल्यामुळे सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफला विलगीकरणात पाठवण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी दक्षिण कोरियाविरुद्धचा सामनाही रद्द करावा लागला होता.
गुरुवारी भारतीय संघाचा चीनशी सामना होणार होता. मात्र, करोनाच्या धोक्यामुळे हा सामनाही रद्द करावा लागला व या स्पर्धेतून भारतीय महिला संघाला माघार घ्यावी लागली. या स्पर्धेत सलामीच्या लढतीत भारतीय संघाने थायलंडचा 13-0 असा दणदणीत पराभव केला होता.
या स्पर्धेत गत उपविजेते असलेल्या भारतीय संघावर करोनामुळे माघार घेण्याची वेळ आली. या आधी भारताचा मलेशियाविरुद्धचा सामनाही रद्द करावा लागला होता. मलेशिया संघातील काही खेळाडूंना येथे दाखल झाल्यावर करोनाची बाधा झाल्यामुळे हा सामना होऊ शकला नाही.