#आयडियाची_कल्पना : बाटली विकत घ्यायला ‘बाई’चा आधार

दारू दुकानात होणाऱ्या गर्दीत खरेदीवर असाही तोडगा

फुरसुंगी – मान लिया भाई… बाटली विकत घेण्यासाठीही बाईचा आधार घेतला जात आहे. दारूविक्रीच्या दुकानात “लेडीज फर्स्ट’ म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग. विचारणा नाही, पोलिसांचा त्रास नाही, झिरो पोलीस आणि कर्मचाऱ्यांची कटकट नाही अगदी विनात्रास दारू खरेदी करीत महिला काही वाइन शॉपमधून बाहेर पडत होत्या. बेरोजगार मजुरांना पैसे देऊन लांबच लांब रांगेत थांबविणाऱ्यांच्याही पुढची आयडिया लढवित अनेक जण महिला मंडळींनाच चक्‍क दारू आणायला सांगत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले.

लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे बहुतेक दुकाने उघडली आहेत. मात्र, त्यामध्ये दारूविक्रीच्या दुकानांसमोरील रांगा लक्ष वेधून घेत आहेत. हार्डवेअर, कपडे, चष्माघरे अशा दुकानांमध्ये अद्यापही फारशी वर्दळ नाही. दारूची दुकाने आजही ओसंडून वाहत आहेत. दारूड्यांच्या सोयीसाठी काही ठिकाणी उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी भरजरी मंडपही उभारण्यात आले.

बहुतांशी ठिकाणी पिण्याचे थंडगार पाणीही उपलब्ध करून दिलेले आहे. विशेष म्हणजे शेजारीच बाकड्यावर चकणा विक्री केंद्र सुरू आहेत. तेथे प्लॅस्टिकचे ग्लास दिले जात असून सेवेला पोरंसोरं ठेवलेली आहेत.

पुणे शहर तसेच मध्य पेठांतील दारू विक्रीची दुकाने आजही बंद आहेत. त्यामुळे अनेक पुणेकर उपनगराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे उपनगरातील अशा दुकानांत गर्दी होत आहे. दोन पैसे जास्त घ्या. पण, लवकर द्या. अशी आर्जव केली जात असताना महिलांनाही दारू आणायला पाठविले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.