नवी दिल्ली – आता भारतीय सैन्यदलात पहिल्यांदाच सैनिक म्हणून महिलांची निवड केली जाणार असून त्यासाठीची ऑनलाईन भरती प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे.
जनरल बिपीन रावत यांनी सैन्यदल प्रमुखाचा पदभार हाती घेतल्यानंतर महिलांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला. यासाठी संरक्षण मंत्रालयाचीही मंजूरी मिळाली. त्यानुसार आता ही भरती आयोजित करण्यात आली त्याची नोंदणी आज (दि. 25 एप्रिल) पासून सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी वेगळी बटालियन असण्याची शक्यता आहे. महिला लष्करी पोलीस, असे या पदाचे नाव आहे. यापूर्वी 1992 पासून केवळ अधिकारी पदावरच महिलांची भरती करण्यात येत होती. आता जवानांच्या समकक्ष पदावर शंभर जागांवर महिलांची भरती करण्यात येणार आहे.
भरतीसाठी अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. महिलांचे शिक्षण कमीतकमी दहावी पास , वय 17 ते 21 , उंची 142 सेमी असायला हवी. तसेच महत्वाचे म्हणजे केवळ लग्न न झालेल्या मुलीच यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच घटस्फोटीत , विधवा स्त्रिया ज्यांना अपत्य नाही अशा महिलाच अर्ज करू शकणार आहेत. तसे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहेत. ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यापैकी निवड झालेल्यांना लेखी आणि शारीरिक तपासणीसाठी बोलविले जाणार आहे. गुरुवारपासून सुरू झालेली ही अर्ज प्रक्रीया 8 जून पर्यंत सूरू राहणार आहे.