एचसीएमटीआरला चीनच्या कंपनीची निविदा

आणखी सहा कंपन्यांनीही दर्शवली तयारी


आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “प्रि बीड’ मिटींग


तीन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थिती

पुणे – शहरातील बहुचर्चीत अंतर्गत वर्तुळाकार (एचसीएमटीआर) रस्त्याची निविदा प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली असून, पहिल्यादाच बांधकाम क्षेत्रामध्ये एका चीनच्या कंपनीने या प्रकल्पासाठी निविदा भरली आहे.

चीनच्या कंपनीसह सात कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. यापैकी तीन कंपन्यांचे प्रतिनिधी बुधवारी महापालिका भवन येथे आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “प्रि बीड’ मिटींगला उपस्थित होते.

या बैठकीमध्ये एल ऍन्ड टी, जे कुमार, वेलस्पन या कंपन्यांनी त्यांच्या प्रस्तावांचे सादरीकरण केले. तर एका चायनीज कंपनीसह नोएडा आणि मुंबईतील चार कंपन्यांनी महापालिकेला ई-मेलद्वारे हा प्रकल्प उभारणीची तयारी दाखवली. याशिवाय, काही तांत्रिक बाबींबाबत स्पष्टीकरणही मागवले आहे.

एचसीएमटीआर रस्त्याच्या कामासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. काम अधिक गतीने होण्यासाठी महापालिका आयुक्तांनी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम अधिक गतीने सुरू आहे. त्याला मुदतवाढही मिळाली आहे.

एचसीएमटीआर रस्त्याची लांबी 36 किमी असून, यासाठी 5 हजार 912 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. जून महिन्यामध्ये एचसीएमटीआर रस्त्याचे काम सुरू होण्याची शक्‍यता आहे. निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांना महापालिका प्रशासनाने 14 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

पुणे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. मागील दोन वर्षांपासून प्रशासनाने ठोस पावले उचलत रस्त्याचा आराखडा तयार केला असून, निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. खुद्द मुख्यमंत्री या रस्त्याचा कामाचा आढावा घेतल्यामुळे याला गती मिळाली आहे.
राज्य सरकारने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला टीओडी झोन घोषित केला आहे. 24 मीटर रुंदीचा हा रस्ता असून, यावर बीआरटी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

हॅम, डीबीएमओटी असे दोन पर्याय अंतिम
एचसीएमटीआर हा मार्ग संपूर्णत: उन्नत असलेल्या या मार्गावर सहापदरी रस्ता असून, त्यापैकी दोन मार्गिका या बीआरटीसाठी असतील. या मार्गावर प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी 27 ठिकाणी रॅम्प असतील. या प्रकल्पासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे. हा प्रकल्प खासगी सहकार्यातून उभारण्यात येणार असून, महापालिकेने विविध पर्यायांचा अभ्यास करून हॅम आणि डीबीएमओटी असे दोन पर्याय अंतिम करून इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.