पिंपरी – कौटुंबिक कलहातून एका महिलेने पवना नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात बुडणाऱ्या महिलेला बाहेर काढले. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी दहा वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. पोलिसांनी तत्परता दाखवल्याने महिलेचे प्राण वाचले.
आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला पिंपळे गुरव परिसरातील रहिवासी आहे. लॉकडाऊनच्या काळात घरावर आर्थिक संकट आले. त्यात भरीस भर म्हणून पतीही कामधंदा करीत नाही. यावरून पती-पत्नीचे रविवारी सकाळी भांडण झाले. या भांडणाच्या रागातून महिलेने आत्महत्येचा निर्णय घेतला. तिने पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळून वाहणाऱ्या पवना नदीत उडी मारली. हा प्रकार पाहणाऱ्या लोकांनी ही माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांना माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, पोलीस कर्मचारी अमोल लावंड, दीपक पिसे, हंसराज गोरे यांच्या पथकासह घटनास्थळ गाठले.
महिला नदी पात्रात सुमारे 30 फूट आत वाहत गेली होती. पोलिसांनी पाण्यात उतरून दोरीच्या सहाय्याने महिलेला नदीतून बाहेर काढले. महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग यांनी सांगितले आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. महिलेचा जबाब घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.