सातारा – गुुगलपेद्वारे झालेल्या चुकीच्या व्यवहाराबाबत केलेल्या तक्रारीची माहिती ऑनलाइन पहात असतानाच, सायबर गुन्हेगाराने बॅंकेतून बोलत असल्याचे फोन कॉलवरून सांगून कल्याणी वसंत माने (वय 55, रा. कामाठीपुरा, सातारा) यांना पाच लाख 44 हजार 429 रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. या प्रकरणी कल्याणी माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कल्याणी माने यांनी त्यांच्या युनियन बॅंकेतील खात्याला जोडलेल्या गुगल पेद्वारे एक व्यवहार केला होता. ते पैसे चुकीच्या व्यक्तीला गेल्याची तक्रार त्यांनी ऑनलाइन नोंदवली होती. या ऑनलाइन केलेल्या तक्रारीवर पुढे काय कार्यवाही झाली, याची माहिती घेण्याचा प्रयत्न त्या मंगळवारी (दि. 14) करत होत्या. त्यावेळी त्यांना 7980216634 या मोबाइल क्रमांकावरून कॉल आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने युनियन बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास मिळवला. त्यानंतर संशयिताने चुकलेल्या ट्रान्झॅक्शनची 20 हजार रुपयांची रक्कम परत मिळवण्यासाठी प्रोसीजर करायला सांगितले.
त्या बहाण्याने त्याने माने यांच्या डेबिट कार्डचा फोटो व्हॉटस्ऍपवर मागवून घेतला. त्यानंतर संशयिताने माने यांना मोबाइलमध्ये क्विक ऑनलाइन सपोर्ट ऍप डाऊनलोड करून घ्यायला सांगितले. माने यांनी ते ऍप त्यांच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर संशयिताने त्या ऍपद्वारे माने यांचा मोबाइल हॅक करून त्यांच्या खात्यावरील पाच लाख 44 हजार 429 रुपये अनोळखी बॅंक खात्यावर वर्ग केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर तपास करत आहेत.