- ठेकेदाराचा बोनस देण्यास नकार; कर्मचारी मागणार कामगार आयुक्तांकडे दाद
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कायम कर्मचारी यांना 8.33 टक्के बोनस सह 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. मात्र महिला सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदारांनी दिवाळी बोनस देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर कष्टकरी कामगार पंचायत कार्यालयात धाव घेतली असता पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठेकेदाराच्या या निर्णयाविरोधात कामगार आयुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनाच्या काळात शहर लॉकडाऊन असताना या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालत, शहराचे सार्वजनिक आरोग्य राखले. असे असताना महापालिका सेवेत कायम असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना भरघोस प्रोत्साहन भत्तादेखील देण्यात आला आहे.
परंतु ठेकेदाराकडे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना बोनससह महापालिका सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली होती. त्यानंतर महापालिकेने कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला. त्यानंतर या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडे बोनसबाबत विचारणा केली असता, त्याने बोनस देण्यास असमर्थता दर्शविली आहे.
कायम व कंत्राटी पद्धतीने कामे करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस देणे कायद्याने बंधनकारक आहे. या कायद्याची सर्वत्र अंमलबजावणी होत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र कायदा पायदळी तुडवला जात आहे. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांनी शनिवारी (दि. 31) कामावरून सुट्टी होताच पिंपरी येथील कष्टकरी कामगार पंचायत कार्यालयात धाव घेऊन पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांची भेट घेतली. याबाबत कामगार आयुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी संगीता जानराव, मधुरा डांगे, कांता कांबळे व इतर सफाई महिला कर्मचारी उपस्थित होत्या.