लोकसभेत महुआ मोईत्रांविषयीचा अहवाल सादर होणार
नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. 4 ते 22 डिसेंबर या कालावधीत ते अधिवेशन होईल. अधिवेशनात 15 बैठका होतील. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरूवारी सोशल मीडियावरून अधिवेशनाच्या वेळापत्रकाची माहिती दिली. सध्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकारण तापले आहे. त्या निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होईल.
त्यानंतर पुढच्याच दिवशी संसद अधिवेशन सुरू होईल. त्यामुळे तापलेल्या राजकारणाची धग आणखीच वाढण्याची चिन्हे आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अधिवेशनावेळी लोकसभेत तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधातील अहवाल मांडला जाईल.
पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्याचा ठपका महुआंवर ठेवण्यात आला आहे. त्यावरून त्यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस लोकसभेच्या आचार समितीने केली आहे. त्यासंबंधीच्या अहवालावर चर्चा होईल. त्यानंतर खासदारकी रद्द करण्याच्या सरकारी ठरावावर मतदान घेण्यात येईल. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
अधिवेशनात काही महत्वाची विधेयके सादर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असेल. त्यात प्रामुख्याने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया कायदा आणि पुरावा कायदा यांची जागा घेणाऱ्या विधेयकांचा समावेश असेल. त्याशिवाय, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्यांविषयीचे विधेयक प्रलंबित आहे. तेही मांडले जाऊ शकते.