जिल्ह्यात मतदान केंद्रही वाढणार?

जिल्हा प्रशासनाचा निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव : निर्णयाकडे लक्ष

पुणे – जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नाव नोंदणी मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दीड लाख नवमतदार वाढले आहेत. मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्यात 110 मतदान केंद्र वाढणार असून त्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये मतदारांच्या नाव, पत्यांमधील दुरुस्ती, दुबार नावे वगळण्याबरोबरच नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मोहिम राबविण्यात आली होती. महाविद्यालयांमध्ये सुध्दा मतदार नाव नोंदविण्यासाठी मोहिम राबविली होती.

तसेच जुलैमध्ये विशेष मोहीम राबविली होती. या सर्व मोहिमांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दीड लाख अर्ज आले. या सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार शहरी भागात 1,400 मतदारांसाठी एक मतदान केंद्र, तर ग्रामीण भागात 1,200 मतदारांसाठी एक केंद्र असावे, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे. मागील लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रांची संख्या 7 हजार 900 होती.

Leave A Reply

Your email address will not be published.