पुणे – जुन्नर तालुक्यातील कट्टर शिवसैनिक तथा जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी एकनिष्ठेने 20 वर्षे तालुक्यात शिवसेना वाढवली, त्यांची काही महिन्यांपूर्वी पक्षाने हकालपट्टी केली तरी अनेक महिने पक्षाशीच बांधिल राहिल्या; पण आगामी निवडणुका आणि हकालपट्टीचे शल्य झुगारून त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपचे “कमळ’ हातात घेत शिवसेनेला “धोबीपछाड’ करण्यास सज्ज झाले आहेत.
दरम्यान, भाजपच्या या खेळीने जुन्नर तालुक्यातील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद नक्की उमटणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्यापुढे भाजप हाच प्रमुख विरोधी पक्ष राहिला आहे. याआधी शिवसेनेशी युती करून लढत असलेल्या भाजपला यावेळी स्वबळावर निवडणुका लढाव्या लागणार आहेत. त्यामुळे जेथे आपली ताकद नाही अशा ठिकाणी आयात उमेदवार शोधून आपली बळ वाढविण्याचा प्रयत्न करताना भाजपचे नेते दिसत आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी पुणे जिल्ह्यात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला दौरा बरेच काही सांगून गेला होता. त्यानुसार आता भाजपची जिल्ह्यात वाटचाल सुरू झाली असून जुन्नर तालुक्यात शिवसेनेला जोरदार धक्का देत वाघाला घायाळ करण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी सुरू केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आशा बुचके या 2019च्या विधानसभा निवडणुकीसह दोनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेसाठी निवडणूक लढवली; मात्र तीनहीवेळा त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. तर 2019मध्ये थेट शिवसेना सोडून गेलेले आणि 2014मध्ये मनसेचे एकमेव तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांना 2019मध्ये शिवसेनेने पुन्हा पक्षात “एन्ट्री’ देत बुचके यांचे तिकिट कापून सोनवणेंना तिकीट दिले.
यामुळे बुचके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत सोनवणेंविरोधात दंड थोपटत निवडणूक रिंगणात उतरल्याने शिवसेनेने त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली होती. तरी त्या शिवसैनिक म्हणूनच वावरत होत्या.
पण शिवसेनेने त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने अखेर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या आशा बुचके यांना भाजपच्या तिकिटावर आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
अनेकवेळा अपमान होऊन देखील शिवसेना सोडण्याची मनापासून कधीच इच्छा नव्हती. पक्षाने केलेली हकालपट्टी जिव्हारी लागली. मागील चार महिन्यांपासून मान अपमान सहन करीत शिवसेनेत प्रवेश करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची भेट घेतली. शिवसेना भवनवर गेले. पक्षप्रवेशाची चर्चा करताना स्वतःसाठी काहीही मागितले नव्हते. माझ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, कार्यकर्त्यांचे पुनवर्सन करावे, अशी मी अपेक्षा केली होती; मात्र पदरी उपेक्षाच आली.
-आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्य
“प्रभात’च्या वृत्तावर मोहोर
“जुन्नरमध्ये भाजप कात टाकणार?’ या मथळ्याखाली 4 ऑगस्ट 2021 रोजी “प्रभात’ने सर्वप्रथम वृत्तप्रसिद्ध करून आशा बुचके भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले होते. याशिवाय नेत्यांच्या आयातीबाबत भाजप ‘आशा’वादी असल्याचेही म्हटले होत. रविवारी (दि. 15) त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केल्याने “प्रभात’ ने प्रसिद्ध केलेले वृत्त तंतोतंत खरे ठरल्याचे सिद्ध झाले आहे.