वाशिम – राज्यातील शेतकरी आणि शेती हीच आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या संकल्पनेतून काम करण्यात येत आहे. वाशिम येथे उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे कृषि संकुल असावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आज, 15 ऑगस्ट रोजी वाशिम येथील स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाच्या ई-भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र वाशिम जिल्ह्याचे वचन दिले होते. ते त्यांनी वाशिम जिल्ह्याची निर्मिती करून पूर्ण केले. त्याच वाशिम जिल्ह्यात आज राज्यातील पहिल्या अद्ययावत बहुउद्देशीय कृषि संकुलाचे भूमिपूजन होत आहे, हा मोठा योगायोग आहे.
विकेल ते पिकेल या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बाजारपेठेत जे विकेल तेच पिकविण्यावर आपला भर राहणार आहे. एक जिल्हा, एक पीक या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.