राज्यातील लॉकडाऊन वाढणार की उठणार ?

निर्बंध शिथिल करण्यावर मंत्रीमंडळाचे एकमत; एक की सात जून यावर आज निर्णय

मुंबई –  राज्यातील लॉकडाऊन आणखी एका आठवड्याने वाढवण्याचा विचार सरकार गांभीर्याने करत आहे. मात्र, त्याच वेळी करोना आटोक्‍यात आणण्यासाठी लादलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यावर राज्य सरकारच्या मंत्रीमंडळात एकमत झाल्याची माहिती सरकारमधील विश्‍वासार्ह सूत्रांनी दिली.

सध्या मंत्रीमंडळात या मुद्‌द्‌यावर दोन मतप्रवाह आहेत. एक म्हणजे लॉकडाऊन एक जून पासून उठवायचे की सात जून पासून. मात्र हा लॉकडाऊन चार टप्प्यात उठवला जाण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात जीवनावश्‍यक नसलेल्या वस्तूंची दुकाने काही बंधनांसह उघडली जातील. त्यासाठी कमी वेळ आणि सम – विषम पध्दत अवलंबली जाईल. राज्य अनलॉक करण्याचा निर्णय उद्या (बुधवारी) होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल. मात्र, विषाणूंचा अद्याप असणारा धोका लक्षात ठेवून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील. लोकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अनलॉकच्या शेवटच्या टप्प्यात सुरू करण्यात येईल, असे या सूत्रांनी सांगितले.

राज्यातील संसर्ग दर 10 टक्‍क्‍यांच्या खाली आल्यानंतर एक जून नंतर लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिले. पुरेशी औषधे आणि आरोग्य यंत्रणा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मे महिन्याच्या या अखेरच्या आठवड्यात सरकार परिस्थितीचा आढावा घेत आहे. त्यात संसर्ग दर 10 टक्‍क्‍याच्या खाली आला तर तर राज्य सरकार काही निर्बंध शिथिल करण्याची शक्‍यता असल्याचे टोपे यांनी सांगितले होते. अन्य काही राज्यांसोबत महाराष्ट्रात काही आठवडे सर्वाधिक संसर्ग दर होता. सध्या राज्यात संसर्ग दर 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. मात्र केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्याचा संसर्ग दर मंगळवारी 12 टक्के होता.

राज्यात करोनाची साथ वेगाने पसरण्यास सुरवात झाल्यानंतर सरकारने पाच एप्रिल रोजी निर्बंध लादले होते. सध्या राज्याच्या 23 जिल्ह्यात संसर्ग दर 10 टक्‍क्‍यापेक्षा अधिक होता. तामिळनाडूत 37 जिल्ह्यात तर कर्नाटकात 29 जिल्ह्यात संसर्ग दर 10 टक्‍क्‍यापेक्षा अधिक आहे. तर ओडीशा आणि राजस्थानमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 18 आणि 24 जिल्ह्यात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.