दुबई – आयपीएल स्पर्धेत अपेक्षित कामगिरी झाली नसली तरीही चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार या नात्याने उर्वरित सर्व सामने खेळणार आहे. कोणत्याही जबाबदारीपासून पळ काढणार नाही, असा निर्धार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केला आहे.
यंदाच्या स्पर्धेत चेन्नईची कामगिरी सामन्यागणिक खालावली. त्यांना 11 सामन्यात केवळ तीन सामने जिंकण्यात यश आले. त्यांच्या पराभवापेक्षाही त्यांची पराभूत मानसिकताच टीकेचे लक्ष्य ठरली आहे.
चेन्नईच्या या सुमार कामगिरीवर बोलताना धोनीनेही नाराजी व्यक्त केली. संघातील फलंदाजांना तसेच गोलंदाजांना सातत्याने येत असलेले अपयश मला अनपेक्षित होते.
मात्र, आता जे काही घडले आहे ते निराशाजनक असले तरीही त्यापासून पळ काढणार नाही. उर्वरित सामन्यांना सामोरा जाणार आहे. मी संघाचा कर्णधार आहे त्यामुळे कोणतीही जबाबदारी टाळणार नाही व पराभवांसाठी कोणा एकाला जबाबदारही धरणार नाही. जे अपयश आले ते सर्वांचेच आहे, असेही धोनी म्हणाला.
धोनीच कर्णधार राहणार
यंदाच्या स्पर्धेत जरी धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी जरी सुमार झालेली असली तरीही संघ व्यवस्थापनाने मात्र धोनीचीच बाजू घेतली आहे. सध्या संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही पण तरीही पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेतही तोच कर्णधार असेल, असे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.