अमित डोंगरे
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचाही यशस्वी कर्णधार, बेस्ट फिनिशर, कॅप्टन कुल अशा असंख्य संबोधनांनी ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी आता पराजित योद्धा अशा नावानेही ओळखला जाणार आहे. नामुष्की या शब्दाचा खरा अर्थ आता यंदाच्या स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवांमुळे क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आला असेल.
ज्या संघाला धोनीने बलाढ्य बनवले त्याचीच घसरणही त्यानाच पाहावी लागत आहे यासारखी अन्य शोकांतिका नसावी. आयपीएलला प्रारंभ झाल्यापासून आता हे 13 वे वर्ष आहे. गेल्या बारा वर्षांत म्हणजेच एका तपात धोनीदेखील ज्ञानी वगैरे बनण्याच्या मार्गावर होता. पण त्याच्यासह संघातील सर्वच खेळाडूंच्या बेजबाबदारपणामुळे तसेच धोनीच्या निराशाजनक मानसिकतेमुळे चेन्नईवर ही परिस्थिती ओढावल्याचे कोणीही मान्य करेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधी दीड वर्षांची विश्रांती व नंतर निवृत्ती असे दोन महत्त्वाचे निर्णय घेतल्यावर हा जिगरबाज खेळाडू आयपीएलमध्ये सरस कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करेल हा अंदाज खोटा ठरला. त्याच्या काही आंगतुक निर्णयाचा फटका त्याच्यासह संपूर्ण चेन्नई संघाला बसला. आता त्याचे चाहते कितीही बाजू सावरून घेत असले तरी सत्य परिस्थिती बदलणार नाही. आता केवळ 4 महिन्यांनी पुन्हा एकदा आयपीएलचे बिगुल वाजेल.
करोनामुळे यंदाची स्पर्धा सहा महिने लांबणीवर गेली व आता ती अमिरातीत सुरू आहे. मात्र, पुढील वर्षीची स्पर्धा नेहमीच्या परंपरेप्रमाणे मार्च महिन्यातच होणार हे निश्चितही झाले आहे. त्यावेळी एक परिस्थिती बदललेली असेल.
चेन्नई संघातील चाळीशीकडे झुकलेले अनेक खेळाडू या स्पर्धेला बायबाय करतील व त्यात कदाचित धोनीही असेल. नवा गडी नवे राज्य याप्रमाणे चेन्नईला कर्णधार बदललेला असेल, धोनीची सूत्रे अन्य खेळाडूच्या हाती असतील व स्वतः धोनी मेंन्टॉरच्या भूमिकेत पाहायला मिळेल. धोनीच्या नेतृत्वाला यंदाच्या स्पर्धेत झारीतील शुक्राचार्यांनी धक्का दिल्याचे बोलले जात असले तरीही त्याच्या नेतृत्वावर व क्षमतेवरही शंका घेतली जाऊ लागल्याचे चित्र दिसले तेव्हा धोनीयुगाच्या अस्ताची सुरुवात असल्याचेही दिसत आहे.
यंदाच्या स्पर्धेत चेन्नईला पराभवांची मालिकाच खंडित करता आली नाही. तसेच धोनीच्या मतांमधून संघातील खेळाडूंबाबची नाराजीही स्पष्टपणे दिसून आली.
संघातील अनेक खेळाडूंच्या सुमार कामगिरीबद्दल स्वतः जबाबदारी घेणारा व त्याच खेळाडूंमधून विजेता घडवणारा हा जागतिक क्रिकेटमधील शिल्पकार आता वयोपरत्वे अपयशी ठरत आहे का, असा प्रश्न पडावा इतकी चेन्नईची कामगिरी खालावली.
आपला तोल ढळू न देणारा धोनी चक्क मैदानावरच पंचांशी तसेच सहकारी खेळाडूंच्या सुमार कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना जेव्हा दिसला तेव्हाच तो क्षण त्याच्या क्रिकेटमधील एक्झिटची नांदी ठरली. या स्पर्धेच्या इतिहासात तीन वेळा विजेतेपद, तसेच सहावेळा उपविजेतेपद अशी थक्क करणारी कामगिरी करणारा हाच तो संघ का, असाही प्रश्न या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीवरून निर्माण झाला. इतकेच नाही तर बाल्यावस्थेतील चेन्नई संघाला आयपीएलमधील वर्चस्वाचे लायसन्स मिळवून देणारा हाच तो धोनी का, या प्रश्नानेही मनात घर केले.
यशाच्या शिखरावर असताना निवृत्त झाले की स्वाभिमान तर टिकतोच पण आत्मसन्मानालाही ठेच लागत नाही हे विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी सोदाहरण दाखवून दिले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत धोनीही थांबण्याचा निर्णय घेईल ही अपेक्षा आहे.
स्वतःचे अवमूल्यन आणखीन करून घेण्यापेक्षा संघाचा मेंन्टॉर किंवा प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहिला तरीही त्याच्याकडून प्रेरणा घेत देशातच नव्हे तर जगभरात नवनवे खेळाडू तयार होतील. गावसकरांची कॉपी करण्याचे धारिष्ट्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, अनिल कुंबळे व युवराजसिंग या बड्या खेळाडूंनीही दाखवले नाही. संघातील दशमग्रह झाल्यावरच त्यांनी आपली कारकीर्द आवरती घेतली. आता धोनीला अपमानित झालेले पाहायला लागू नये म्हणजे झाले.
यंदाची आयपीएल स्पर्धेतील चेन्नईचे अव्हान तर संपुष्टात आले आहे. त्यामुळे उर्वरित सामने खेळून मिळेल त्या विमानाने मायदेशी परत यावे व आता या स्पर्धेतील निवृत्तीचाही निर्णय वेळेवेळ घ्यावा हीच आता धोनीकडून अपेक्षा आहे. त्याच्या संघातील नुसत्या असण्यानेच अन्य खेळाडूंना प्रेरणा मिळते असे कथन करणारा काळ जुना झाला. आता त्याच्या असण्या नसण्यानेही संघाला फरक पडणार नाही इतकी बदललेली परिस्थिती पाहण्याचे त्याच्या नशिबी आले.