पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ घटनेनंतर पुणे पोलिसांना जाग आली आहे. त्यांनी ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई सुरू केली आहे. घटना घडलेल्या येरवडा पोलीस स्टेशनसह अधिक पब विमानतळ, कोरेगाव पार्कसह चतृ:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी दोन ठिकाणी, तर उर्वरित पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक ठिकाणी अशी शहरात ३७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि. २१) रात्री १२ ते बुधवारी रात्री ३ या वेळेत १ हजार २५५ वाहनांची तपासणी करून ८५ ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाई करण्यात आल्या. मुंढवा आणि सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्वाधिक प्रत्येकी १० कारवाई करण्यात आली. सोबतच इतर १९५ कारवाया करून एकूण २ लाख २२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक आणि स्थानिक पोलिसांनी मिळून ही कारवाई केली. या कारवाईसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनकडील १ पोलीस अधिकारी व ४ अंमलदार व वाहतूक शाखेकडील १ पोलीस अधिकारी व तीन अंमलदार नाकाबंदीसाठी नेमण्यात आले होते. कल्याणीनगर घटनेनंतर केलेल्या कारवाईत सातत्य राहणार का, असा प्रश्न नागरिकांतून व्यक्त होत आहे.