न्युयॉर्क – जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) थकबाकी देण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले असून हा निधी संयुक्त राष्ट्रांच्या योजनांसाठी दिला जाईल असेही सांगितले आहे.
करोनावरील लस विकसित आणि वितरित करण्याच्या डब्ल्यूएचओ संचालित प्रकल्पात अमेरिका सहभागी होणार नसल्याचे बुधवारी व्हाइट हाऊसने जाहीर केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय जाहिर केला. संघटनेवर चीनचा प्रभाव असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच संघटनेला दिली जाणारी 62 दशलक्ष डॉलरची थकबाकी देखील आता दिली जाणार नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
संघटनेच्या काही बैठकांमध्ये अमेरिका सहभागी होणार असली तरी एखाद्या महत्वाच्या योजनेसाठी यापुढे एकदाच निधी दिला जाइल या निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. अफगाणिस्तान व पाकिस्तानातील पोलिओ निर्मूलन तसेच लिबिया व सीरियाला दिली जाणारी मदत या योजनांमध्ये अमेरिका निधी देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.