कोरेगाव भीमा -शिवजयंतीपर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी केली नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना किल्ले शिवनेरीवर येऊ देणार नाही, असा इशारा जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिला आहे. त्यामुळे आता राज्यात कोश्यारी यांच्या हकालपट्टीवर रान पेटणार हे निश्चित झाले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वारसा विचारांचा, वसा महाराष्ट्राचा आत्मक्लेश करण्यासाठी व छत्रपतींच्या विचारांचे वारसदार म्हणून एकत्र येत आमदार बेनके व इतर आमदारांसह नागरिकांनी एकत्र येत आत्मक्लेश करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर पुष्पहार अपर्ण करीत नतमस्तक झाल्यानंतर वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी व इतरांचा मौन धारण करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी आमदार अशोक पवार, रोहित पवार, अमोल मिटकरी, अतुल बेनके, संदीप क्षीरसागर, सुनील टिंगरे, सुनील शेळके उपस्थित होते. यावेळी ऐतिहासिक संदर्भ देणाऱ्या आज्ञापत्र, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वाभिमानी व ज्वलंत इतिहासाचे दाखले देण्यात आले. यावेळी आपल्या शाहिरी आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे व पोवाड्याच्या माध्यमातून विचारांचा जागर करणाऱ्या शाहीर राजेंद्र कांबळे व सहकाऱ्यांनी मनोवेधक पोवाडा सादर केला. नितीन पवार, संदीप क्षीरसागर,
जयदेव गायकवाड, प्रशांत जगताप, सूरज चव्हाण, संजय दौंड, रविकांत वर्पे, मल्हारराव होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, जुनेद दुर्व्यानी, प्राजक्ता तनपुरे, लोचन शिवले, सुरेखा भोरडे, पंडित दरेकर, राजेंद्र नरवडे, वढू बुद्रुकच्या सरपंच सारिका शिवले, उपसरपंच राहुल कुंभार, अंजली शिवले, संगीता सावंत, लाला तांबे, पप्पू आरगडे, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, अनिल शिवले मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती उदयनराजेंना पाठिंबा – रोहित पवार
महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा देण्याचा व महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आपण शांत बसणार नाही. रायगडावर राज्यपाल पायी गेले. यापेक्षा वाणीच्या माध्यमातून तुम्ही एकदा नाही तर दोनवेळा महान व्यक्तीचा अवमान करता. यावरून त्यांची विचारसरणी कळते. रायगडावर छत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपतींचे वारस म्हणून गेले आहेत. त्यांना माझा पाठिंबा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
खासदार डॉ. कोल्हे गैरहजर
वढू बुद्रुक येथे राष्ट्रवादीच्या सात ते आठ आमदारांनी एकत्र येत आत्मक्लेश आंदोलन केले. मात्र, यावेळी लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले तसेच छत्रपतींचा इतिहास जगासमोर मांडणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे मात्र यावेळी गैरहजर असल्याची चांगलीच चर्चा रंगली. याबाबत बोलताना अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांची बाजू मांडत असतात. परंतु आज अचानकपणे सर्वजण एकत्र आलो होतो. ते देखील आमच्या सोबत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.