पुणे -करोना काळात सामान्यांचे जगणे कठीण झाले असताना वारजे येथील महापालिकेच्या बारटक्के रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञ मात्र रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खाण्यात व्यस्त होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांनी 18 हजार 500 रुग्णांपैकी तब्बल 10 ते 12 हजार रुग्ण बोगस दाखवले. यानंतर या बोगस रुग्णांचे किट परस्पर बाजारात विक्री केले. याद्वारे 80 लाख रुपये लाटले गेल्याची शक्यता एका तक्रारदाराने वर्तवली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी 25 सप्टेंबर 2022 रोजी महापालिकेला अहवाल दिला होता. मात्र, महापालिकेने स्वत:चेच अधिकारी अडकले असल्याने अहवालाकडे दुर्लक्ष केले आहे.
याप्रकरणाचे तक्रारदार स्वत: महापालिकेचे वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. ते सध्या एका प्रकरणात निलंबित आहेत. घोटाळा लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना तथ्य आढळले. त्यांनी महापालिकेला एक अहवाल पाठवून गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. तपासातील तथ्य गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे असल्याचेही निदर्शनास आणून दिले. पोलीस मागील तीन महिने महापालिका तक्रार दाखल करण्याची वाट पहात आहेत. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एकच मोबाइल नंबर 800 वेळा नोंदवला, नावेही बोगस वापरली
करोना रुग्णांची नोंद “आयसीएमआर’ पोर्टलवर ऑनलाइन करण्यासाठी व घोटाळा लपवण्यासाठी रुग्णाच्या मोबाइल नंबरऐवजी केंद्रावरील डॉक्टर, कर्मचारी यांच्या मोबाइल नंबरचा वापर करण्यात आला. अगदी एकच नंबर 800 पेक्षा अधिक वेळा वापरण्यात आला. विशेष म्हणजे, त्या किट वापरल्या गेल्याचे दाखवण्यासाठी तब्बल 10 ते 12 हजार बोगस नावे नोंदवली गेली. या प्रकरणाचा संशय संशय येऊ नये म्हणून केंद्रावरील डॉक्टर, कर्मचारी यांचे मोबाइल नंबर वापरण्यात आले. याचे धागेदोरे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहचत आहेत.
तक्रारीनूसार आमच्या अधिकाऱ्याने तपास केला. या तपासात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. याचा सविस्तर अहवाल आम्ही सप्टेंबरमध्येच महापालिकेला पाठवला. या अहवालाच्या आधारावरच तक्रार दाखल करा, असेही सांगण्यात आले. मात्र, अद्यापही महापालिकेकडून कोणतीच तक्रार दाखल नाही.
– डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी