मुंबई – सावरकरांना दाढी वाढवणे कधीच मान्य नव्हते. दाढी फक्त शिवाजी महाराजांना चांगली दिसते. त्यामुळे इतर कोणी दाढी वाढवू नये. माणसाने कसे चकचकीत राहायला पाहीजे, असे सावरकरांचे मत होते. मग सावरकरांना मानणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाढी कापतील का?, अशी टिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
राऊत म्हणाले, भाजप म्हणते गाय गोमाता आहे. सावरकरांना हे मान्य नव्हते. सावरकर गायीला उपयुक्त पशू मानायचे. गाईने दुध देणे बंद केल्यास गोमांस खाण्यास काहीच हरकत नाही, असे सावरकरांचे विचार होते. हे विचार भाजपला मान्य होतील का? आधी सावरकर वाचा आणि मग त्यांच्या नावाने यात्रा असा टोलाही त्यांनी भाजपला हानला.
दाढी वाढविण्यावर सावरकरांचे जे विचार होते ते मुख्यमंत्री डॉ. मिंधे आणि त्यांचे 40 आमदार मान्य करणार का?, असा सवाल करत राऊत ुढे म्हणाले, दाढी वाढवणे आपल्या धर्मात बसत नाही. त्यामुळे दाढी वाढवू नका. सावरकरांचा कोणताही फोटो बघा ते कसे दिसतात. त्यामुळे सावरकरांचे विचार मुख्यमंत्र्यांना मान्य असतील तर या विचारांना अनुसरुन मिंधे आणि त्यांचे 40 आमदार दाढी कापणार का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
दंगलीमागे राजकीय अजेंडा
देशात जे काही सुरु आहे ते सर्व राजकीय अजेंड्यासाठीच सुरु आहे. संभाजीनगरमध्ये जी दंगल झाली तोही राजकीय अजेंडाच होता. गौरव यात्रा निघत आहे, तोही राजकीय अजेंडाच आहे, असेही राऊत यांनी सांगितले. भाजप-शिंदे गटाने सावरकारांना नीट वाचले पाहिजे. आधी त्यांच्या विचारांचे पारायण करा आणि मग यात्रा काढा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मतभेद होते. सावरकरांना शेंडी, जानव्ह्याचे हिंदुत्त्व कधीच मान्य नव्हते. बाळासाहेबांनाही असे हिंदुत्त्व कधीच मान्य नव्हते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.