पुणे – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कोयत्याने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी पतीस हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुल गोकुळ प्रतापे (वय 30, रा.विजयनगर, पुनावळे, मूळ उस्मानाबाद ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गौरी प्रतापे (वय 21 ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी घरमालक नवनाथ बोरगे यांनी फिर्याद दिली आहे. राहुल प्रतापे हा सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतो. तो पत्नी गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये भांडणे होत.
दरम्यान, मंगळवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी आरोपी राहुलने पत्नी गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या तावडीतून सुटून गौरी घराबाहेर पळाली. मात्र, रस्त्यावर राहुल याने पत्नीवर कोयत्याने वार करून तिचा खून केला.