पुणे : पुणेरी पाट्या आणि त्यांचे खोचक टोमणे हे एक वेगळेच समीकरण आहे. त्याचसोबत पुण्यातल्या देवांची, मंदिरांची नावे हाही देशभरात चर्चेचा विषय नेहमीच ठरतो. दरम्यान, सध्या पुण्यात उभारण्यात आलेले पंतप्रधान मोदी यांच्या मंदिरावरून देशभरात चर्चा होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून आता पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही त्यांच्या खास शैलीत मिश्किल टिप्पणीही केली.
पुणे तिथे काय उणे हे म्हटले जाते, ते खरं आहे. कारण आपल्या पुणेरी पाट्यांबद्दल नेहमीच सर्वांना कुतुहल असते आणि त्याची चर्चा सर्वत्र पाहण्यास मिळते. त्यामुळे खरोखरच पुणेकरांचा हात कुणी धरू शकत नाही. ज्या भागात आज भूमिपूजन होत आहे, या भागाला डुक्कर खिंड असे म्हटले जाते. या भागात काही वर्षांपूर्वी रानडुकरांचा वावर जास्त असल्यामुळे असे नाव पडले आहे, असे म्हणत अजित पवार यांनी यावेळी शहरातील काही मंदिरांची नावे दाखवली.
ते आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले, “पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानाही सोडलं नाही”. त्यांच्या या विधानानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला.
वन विभागाच्या 35 एकर जागेमध्ये भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.