नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) आर्थिक गुन्हे शाखेने “भारत पे’चे (Bharat pay) सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन यांना समन्स जारी केला आहे. फिनटेक युनिकॉर्नमध्ये 81 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांना 21 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहावे, असा समन्स ईओडब्ल्यूने पाठवला आहे. (Ashneer Grover case)
अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन हे गुरुवारी सुट्टी साजरी करण्यासाठी न्यूयॉर्कला जात होते. दरम्यान त्यांना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले. यानंतर ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी समन्सची पुष्टी करताना सांगितले की, संबंधित दोघांविरोधात लूकआउट नोटीस जारी केल्यानंतर त्यांना दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आले.(Shark tank fame Ashneer Grover)
मे महिन्यात ग्रोवर, माधुरी जैन आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्या विरोधात 81 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात एफआयआर दाखल केला होता.
अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबाने कंपनीत लोकांच्या बोगस नियुक्त्या दाखवून, बनावट पावत्या दाखवून कंपनीची 81.3 कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप ‘भारत पे’ कंपनीने केला आहे. ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी 7 नोव्हेंबरला न्यायालयात स्टेटस रिपोर्ट दाखल केला.