राहुरी– अल्पवयीन मुलीचे फोटो व चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत असल्याची घटना शनी शिंगणापूर रोडच्या एका गावात गेल्या वर्षभरापासून सुरू होती. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात दोघा बहीण- भावावर विनयभंग व पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेतील अल्पवयीन मुलीला आलिशा शेख हिने 2022 मधील रमजान ईदच्या दिवशी आवेज शेख याच्याबरोबर सेल्फी काढायला लावले. त्यानंतर दि. 25 जुलैपर्यंत आवेज शेख याने पीडित अल्पवयीन मुलीच्या फोटोचा वापर करून इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून त्यावर पीडित मुलगी व आरोपी आवेज शेख हे चॅटिंग करत असल्याचे भासवले.
आवेज शेख याने मुलीला फोन व मेसेजद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तू मला आवडतेस, तू माझ्याबरोबर पळून चल, असे म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी आलिशा निसार शेख व आवेज निसार शेख (रा. उंबरे, ता. राहुरी) या दोघा बहिण-भावावर विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहेत. दरम्यान, उंबरे येथील दंगल प्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.