नीरा -पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर हणामारीत झाले. त्यात पतीने पत्नीच्या डोक्यात बॅट मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रथमदर्शी लोकांनी सांगितले. दरम्यान, पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना नीरा (ता. पुरंदर) येथे आज सकाळी घडली.
जमेला दस्तगीर पठाण (वय 55, रा. नीरा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दस्तगीर सिकंदर पठाण (वय 60) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, नीरा येथील वॉर्ड नं. सहामध्ये राहणारे जमेला पठाण व दस्तगीर पठाण यांच्यामध्ये आज सकाळी किरकोळ कारणा वरून वाद झाला. वादाचे रूपांतर हणामारीत झाली. पती दस्तगीर पठाण यांनी पत्नी जमेला हिच्या डोक्यात बॅट मारल्याने त्यांचे डोके फुटल्याने मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला.
घटनेची माहिती मिळताच नीरा येथील पोलीस राजेंद्र भापकर व पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत ही महिलाचा मृत्यू झाला होता. यानंतर या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, वादाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास जेजुरी पोलीस करीत आहे.