मुंबई – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडेंविरोधात एफआयआर दाखल करण्यास विलंब का लागला? अशा कडक शब्दात पनवेल सत्र न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे आढले आहेत. तसेच या प्रकरणात मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी चौकशी करावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात ऍड. अमित कटारनवरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेत आक्षेपार्ह वक्तव्ये होऊनही भिडेंविरोधात गुन्हा दाखल का करत नाही? अशी विचारणा करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिस अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढतानाच शासनाला महत्त्वाचे निर्देश देखील दिले आहेत. या प्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ऍट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत भिडे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबामागील कारणांची प्रशासकीय स्तरावर चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
कटारनवरेंनी याचिका दाखल करताना काही व्हिडीओ क्लिप्सचा दाखला देत 28 जुलै रोजी नवी मुंबई पोलिसांत धाव घेतली होती. मात्र, यावर कार्यवाही करण्यात पोलिसांकडून दिरंगाई करण्यात येत होती. त्यामुळे अखरे कटारनवरे यांनी न्यायालयात धाव घेतली. आता या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.