मुंबई – बॉलीवुडचा सुपरहिट ठरलेला ‘ओह माय गॉड’ चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि परेश रावल यांच्यासह दिग्गज कलाकारांनी महत्वाच्या भुमिका साकारल्या होत्या. आता ‘ओह माय गॉड’ चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘ओह माय गॉड 2’ चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याचा टीझर सध्या प्रदर्शित झाला आहे. मात्र, सिक्वेलमध्ये परेश रावेल यांनी काम करण्यास नकार दिला.
‘ओह माय गॉड 2’ मध्ये काम करण्यात का नकार दिला ? याबाबत खुलासा करताना परेश रावल म्हणाले की, “मला OMG 2 ची कथा आवडली नाही. मला माझे पात्रही आवडले नाही. यामुळे मी या चित्रपटातून बाहेर पडलो होतो. माझ्यासाठी सिक्वेल बनवणे म्हणजे फायदा उचलण्यासारखे आहे. मला त्या पात्रात मजा येत नव्हती, म्हणून मी तो चित्रपट करणार नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “जर एखाद्याला सिक्वेल बनवायचा असेल तर तो ‘लगे रहो मुन्नाभाई’सारखा असला पाहिजे. ‘हेरा फेरी’ चित्रपटही इनकॅश करण्यासारखा आहे. त्यामुळे सिक्वेल असावा तर तो ‘लगे रहो मुन्नाभाई’सारखा, जिथे तुम्ही एक लीप घेता.” दरम्यान, OMG 2 मध्ये परेश रावल दिसणार नाहीत. त्यांच्या जागी नव्या अभिनेत्यांची वर्णी लागली आहे. चित्रपटात अरुण गोविल प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, परेश रावल चित्रपटात नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘OMG 2’ मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय यामी गौतम देखील दिसणार आहे.