मुंबई – मराठमोळ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीअनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांची सून अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने देखील चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर अनेकदा त्या एकत्र फोटो शेअर करत असतात. मात्र सासू-सुनेची ही जोडी आता एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या सिनेमात शिवानी आणि मृणाल एकत्र दिसणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित शिवराज अष्टकातील मागील चार पुष्पामध्ये मृणाल कुलकर्णी या जिजाबाईंच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात देखील त्या जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात आपल्या थोरल्या भावाची पाठराखण करणाऱ्या सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे, तर शिवानी त्याच्या पत्नीच्या म्हणजेच यशोदाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.
View this post on Instagram
शिवानीचा हा सासूबाईंसोबतचा पहिलाच चित्रपट आहे. सोबतच ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता शिवानी या चित्रपटात कसा अभिनय करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. या आधी मृणाल कुलकर्णी यांनी सोनपरी, अवंतिका, आऊसाहेब यासारख्या उत्तम भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी मागील वर्षी 3 मे रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर शिवानी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा!?’ या मालिकेत काम करत आहे. तर विराजस दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.