नवी दिल्ली – कोणताही प्रश्न गूगलला विचारला तरी त्याचे उत्तर गूगल देते. त्यामुळे गूगल इंटरनेटवरील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. अनेक जण प्रश्नांची उकल करण्यासाठी सोपा पर्याय म्हणून लगेच गूगलवर सर्च करतात.
मात्र सध्या एका प्रश्नाचे उत्तर गूगलकडून अनपेक्षित मिळत असल्याने अनेकांचा गोंधळ उडत आहे. अफगाणीस्तानचा क्रिकेटर रशिद खान याची बायको असे सर्च केल्यावर गूगल अनुष्का शर्माचे नाव दाखवत आहे. ही बाब सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी यावर गमतीदार मीम्स तयार केले आहे.
गूगल रशिदचे लग्न झाले आहे असे सांगून त्याच्या बायकोचे नाव मात्र अनुष्का शर्मा असल्याचे सांगत आहे. गूगल त्यांच्या लग्नाची तारीखही सांगतो आहे, 11 डिसेंबर 2017 रोजी या दोघांचा विवाह झाला असल्याचे गूगल सांगतो मात्र ही तारीख विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाची आहे.
खरे तर सर्वांनाच माहिती आहे की, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली हे पतिपत्नी आहेत. सध्या अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याने ती चर्चेत आहे.
खरा प्रश्न असा आहे की गूगल चुकीचे उत्तर का देत आहे? याविषयी अनेक लोकांना उत्सुकता लागली आहे.
खरेतर 2018 मध्ये रशिद खानने एका मुलाखतीत त्याच्या आवडत्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि प्रिती झिंटा असल्याचे सांगितले होते. यामुळे अनेक वेळा रशिद खान आणि अनुष्का शर्मा यांचे नाव एकसोबत गूगलवर आल्याने गूगलने अनुष्काला रशिदची पत्नी असल्याचे म्हटले असावे. गूगल लवकरच ही दुरुस्ती करणार असल्याचे बालले जात आहे.