- बंधाऱ्यावर फिरतोय ड्रोन; अधिकारी म्हणतात माहिती नाही
पवनानगर – पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्याचे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या पवना धरणातून दररोज विद्युत प्रकल्पाद्वारे पाणी विसर्ग केला जातो; मात्र सोमवारी (दि. 12) अचानक धरणाचे चार दरवाजे अर्धा फुटाने उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला हे सौंदर्य टिपण्यासाठी धरणाच्या बंधाऱ्यावरून विनापरवाना “ड्रोन कॅमेरा’ फिरत असल्याने धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणाचे सुरक्षिततेकरिता अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने सुरक्षितता रामभरोसे झाला आहे.
पवना धरण परिसरात दोन किलोमीटर अंतरावर ड्रोन कॅमेऱ्याला कोणालाच परवानगी नसते; मग हा कॅमेरा कसा सुरू, ही प्रसंग माध्यमांना समजल्यानंतर त्यांनी पाटबंधारे ्अधिकाऱ्यांना माहिती देत संबंधित घटनेची माहिती दिली. त्या वेळी पाटबंधारे कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. अधिकाऱ्यांनी प्रथम पाणी विसर्ग बंद केला, काही कर्मचारी शुटिंग करणाऱ्याना शोधण्यासाठी गेले; मात्र तोपर्यंत ते पसार झाले होते.
मात्र यामुळे धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 1992 मध्ये देशात बॉम्बस्फोट झाले. त्या वेळेपासून धरण अतिरेक्याच्या “हिटलिस्ट’वर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून समजल्यानंतर राज्य सरकारने पवना धरणासाठी स्वतंत्र पोलीस सुरक्षायंत्रणा तैनात केली होती; मात्र आता येथे ना होमगार्ड, ना सुरक्षारक्षक यामुळे पवना धरणाच्या सुरक्षतेला धोका असून येथे सुरक्षारक्षकांची नियुक्ती आणि धरणाच्या कडेने संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे
विद्युत केंद्र बंद असल्यामुळे धरणातून सोमवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास चार दरवाजे अर्धा फुटाने उचलून 1400 क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हा विसर्ग दुपारी पाऊणच्या सुमारास बंद म्हणजे एक तासाने बंद करण्यात आला. ड्रोन कॅमेऱ्यावाल्यांनी कोणतेही परवानगी घेतलेली नाही, त्यांनी तो त्यांच्या मनाने उडवाला होता, आमचे कर्मचारी तेथे गेले असता ते तेथून पळून गेले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
– अशोक शेटे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग