मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार? महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावर हक्क कोणाचा यावर निवडणूक आयोग अजूनही तोडगा काढू शकलेला नाही. याबाबत ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक आयोगाच्या दरबारी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर सुनावणीसाठी आजची तारीख देण्यात आली आहे. निवडणूक आयोग शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांनी सांगितलेल्या दाव्यांवर आज सुनावणी होणार आहे.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नसल्याचा दावा केला होता. शिंदे गटाने दाखवलेले चित्र काल्पनिक आहे, तसेच शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घेण्याची मागणी सिब्बल यांनी केली होती. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपद बेकायदा असल्याचा युक्तिवाद केला. शिंदे गटाकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्यामुळे शिंदेंचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचे जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर सांगितले होते.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. पुन्हा निवडीसाठी परवानगी द्या किंवा हा कायदेशीर पेच संपेपर्यंत मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने आयोगात केली होती. निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकांना परवानगी दिली तर याचा अर्थ शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरे गटाचे अस्तित्व मान्य केल्यासारखे होते. त्यामुळे एकतर मुदतवाढ किंवा त्याआधीच काही मोठा निर्णय या दोन शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.